मृत सफाई कामगाराच्या पत्नीला १० लाखांची भरपाई द्या; राज्य सरकारला कोर्टाचे निर्देश
मृत सफाई कामगार सचिन पवार यांची पत्नी संजना पवार (वय २५) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २०१४ सालच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पतीच्या मृत्यूनंतर पालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी केली
सचिन पवार यांचा ११ मे २०१७ रोजी मॅनहोलमध्ये उतरलेल्या सहकाऱ्याला वाचवताना गुदमरून मृत्यू झाला होता.सचिन यांचा सहकारी मॅनहोलमध्ये पडलेला मोबाईल काढत असताना पाय घसरून आतमध्ये पडला होता.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मृत सफाई कामगार सचिन पवार यांची पत्नी संजना पवार (वय २५) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २०१४ सालच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पतीच्या मृत्यूनंतर पालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
सचिन यांचा सहकारी मॅनहोलमध्ये पडलेला मोबाईल काढत असताना पाय घसरून आतमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी आतमध्ये गेलेल्या सचिन पवार यांचाही गुदमरून मृत्यू झाला होता.
न्यायालयाने या घटनेसंदर्भातील कागदपत्रे साकीनाका पोलिसांकडून मागवून घेतली होती. यामध्ये सफाई काम करताना सचिन पवार यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, पालिकेच्या वकिलांनी सचिन पवार हा आमचा कर्मचारी नसल्याचा दावा केला होता.
यावरून न्यायालयाने पालिकेला चांगलेच फटकारले. आम्ही तुमच्या या मानसिकतेचा निषेध करतो. तो तुमच्यासाठीच काम करणारा कोणीतरी होता, असे न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी म्हटले. यावर राज्य सरकारच्या वकिलांनी २०१९ च्या अध्यादेशाचा दाखला देत ही जबाबदारी संबंधित संस्था किंवा कंत्राटदाराची असल्याचे म्हटले होते.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अशी दुर्घटना झाल्यास संबंधित सफाई कामगाराची ओळख पटवणे, ही राज्य सरकारची जबाबदारी असते, हे न्यायालयाने अधोरेखित केले होते. याच आधारे उच्च न्यायालयाने सचिन पवार यांच्या पत्नीला १० लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
याशिवाय, पवार कुटुंबीयांचे पुनर्वसन आणि अन्य बाबींची काळजी घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.नुकसान भरपाईची १० लाखांची रक्कम सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य या विभागांकडून देण्यात यावी.





