मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

404

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची त्यांच्या वर्षा या निवास्थानी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवाय भाजपने सत्ता स्थापनेसंदर्भात काल काही दावे केले होते. या संदर्भात देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघांमध्ये विविध विषयांवर जवळपास दीड तास चर्चा झाली.

भाजपने सत्ता स्थापनेसंदर्भात केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी काल केला होता. आशिष शेलार यांच्या या वक्तव्याला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. “2017 साली शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली. त्याचं प्रायश्चित्त भोगतोय, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. याच संदर्भात आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. याबरोबरच सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात भूमिका घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राज्यभरातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. 3 मे नंतर भोंगे खाली उतरवले नाहित तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईत असा राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. राज्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. परंतु, त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्यांना भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील या सभेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर काय तोडगा काढता येईल या विषयांवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here