मुकेश अंबानींचे आता ‘नमस्ते लंडन’! विकत घेतला 49 बेडरूमचा अलिशान महल

511

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता लंडनवासी होणार असल्याचे संकेत आहेत. इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी लंडनमधील बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क (Buckinghamshire, Stoke Park) या ठिकाणी 300 एकरची जागा विकत घेतली असून त्या ठिकाणी रहायला जाणार आहेत. या परिसरात एक ऐतिहासिक वास्तू असून त्या ठिकाणी अंबानी परिवार आता वास्तव्यास असेल. तब्बल 49 बेडरूम्स असलेला स्टोक पार्कमधील हा महल मुकेश अंबानींनी 592 कोटी रुपये देऊन खरेदी केल्याचं वृत्त आहे. 

कसा आहे हा अलिशान महल? 
अंबानींनी खरेदी केलेल्या या अलिशान महलामध्ये 49 बेडरूम्स आहेत. या महलात एक मिनी हॉस्पिटल असून ते सुसज्ज सोईंनी युक्त आहे. ही वास्तू खुल्या वातावरणात आहे. ही वास्तू खूप जुनी असून 1908 सालापर्यंत ती खासगी मालमत्ता होती. त्यानंतर या वास्तूचे एका क्लबमध्ये रुपांतर करण्यात आलं. यामध्ये अलिशान हॉटेल आहे. तसेच या वास्तुच्या आवारात एक गोल्फ क्लबदेखील आहे. 

या महलात मंदिराची निर्मिती केली जाणार
या वास्तूमध्ये जेम्स बॉन्ड चित्रपटाच्या मालिकेतील दोन चित्रपटांचे शूटिंग करण्यात आलं आहे. अंबानी कुटुंबीय या नवीन घरामध्ये एका मंदिराची निर्मिती करणार असून मुंबईतील दोन पुजाऱ्यांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नवीन महलात गणपती, राधा-कृष्ण आणि हनुमानाची मूर्तीही बसवण्यात येणार आहे. 

अंबानी कुटुंबियांनी या वर्षीची दिवाळी स्टोक पार्कमधील या नव्या महलात साजरी केल्याची माहिती आहे. आता अंबानी कुटुंबीय परत भारतात येणार असून पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ते या नवीन घरी कायम स्वरुपी वास्तव्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. 

कोरोना काळात मुंबईतील अॅन्टिलियामध्ये आणि नंतर जामनगरमध्ये अंबानी कुटुंब वास्तव्यास होतं. जामनगरमध्ये अंबानी समूहाची रिफायनरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here