मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल
एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातनंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण चर्चेत आलं आहे. या अहवालावर भूमिका मांडताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांचं खच्चीकरण व बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असं म्हटलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं समोर आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलनं दोन गुन्हे दाखल केले आहेत.
सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती दिली. “ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील अनेक अकाऊंटधारक मुंबई पोलीस आयुक्तांना ट्रोल करत आहेत. त्यांच्याविरोधात अपशब्दाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या अकाऊंटधारकांवर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खाती बनावट आहेत आणि पोलिसांकडून त्या सर्व बनावट खातेदारांवर कारवाई केली जाईल,” असं करंदीकर म्हणाल्या.
“दुसरा गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलचा फोटो वापरणाऱ्यांवरही दाखल करण्यात आला आहे. आम्ही या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“बदनामीच्या हेतूनं मोहीम”
“कोविडच्या संकटात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असं असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.