मुंबईतील इमारती ठरतायेत कोरोनाचे हॉटस्पॉट; शहरात आणखी निर्बंध वाढवण्याचा विचार नाही

402

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.  विशेष: मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरात दिवसाला सरासरी आठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका सज्ज झाली असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

सुरेश काकाणी पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र समाधानाची बाब म्हणजे जवळपास 90 टक्के रुग्णांना कोणत्याही स्वरुपांची लक्षणे आढळून आलेली नाहीत. शहरातील सुमारे 93 टक्के कोरोनाबाधित हे इमारतींमध्ये राहणारे आहेत. मुंबईच्या ज्या भागांमध्ये इमारतीचे प्रमाण अधिक आहे, तसेच जिथे उच्च मध्यम वर्गीयांची वस्ती आहे, अशी ठिकाणे हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत असल्याचे काकणी यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

दरम्यान मुंबईमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र यातील जवळपास नव्वद टक्के लोकांना लक्षणेच नसल्याने कोरोनाबाधितांसाठी आरक्षीत असलेले शहरातील 80 टक्के बेड रिकामे असल्याचेही काकाणी म्हणाले. आरोग्य सेवक हे सातत्याने कोरोनाबाधितांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. सध्या मुंबईत परिस्थिती नियंत्रणात असून, मुंबईत निर्बंध वाढवण्याचा कोणताही विचार नाही. दोन -तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तेव्हा जर निर्बंध वाढवण्याची आवश्यकता वाटल्यास निर्बंध वाढू असे काकणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here