मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही; नारायण राणेंचे कणकवली पोलिसांना पत्रातून उत्तर

456

सिंधुदुर्गः मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे दिले आहे. राणे यांना कणकवली पोलिसांनी आज दुपारी 3 वाजता चौकशीसाठी हजर रहा, अशी नोटीस दिली होती. खरे तर काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. शिवाय त्यांच्या जामिनावरची आज सुरू असलेली सुनावणीही आता उद्या होणार आहे. याच अनुषंगाने नितेश कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्यांच्या घरावर ही नोटीस चिपकावण्यात आली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्र देऊन या नोटीसचे उत्तर दिले आहे. राणे आपल्या पत्रात म्हणतात की, मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही. कामामुळे आणखी दोन ते तीन दिवस व्यस्त राहणार आहे. व्हिसीद्वारे तुम्ही माझा जबाब घेऊ शकता, असे आवाहनही राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता यावर पोलीस काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. पोलीस खेरच व्हीसीद्वारे त्यांची चौकशी करणार की त्यांना पुन्हा दोन-तीन दिवसांनी बोलवणार हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here