मा. मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांचे ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन
औरंगाबाद ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन जिल्हयातील नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घेण्याचे अनुषंगाने मा.मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले आहे .
नदी लगत राहणा-या तसेच धरण क्षेत्राच्या काठावरिल नागरिकांनी वाढत्या पावसाच्या अनुषंगाने पुर परिस्थीतीच्या दृष्टीकोनातुन प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तसेच वेळीच कुटूंबासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे
??आपत्कालिन क्रमांक 0240-2381633, 2392151 स्वत:जवळ बाळगावे. जेणे करून संकटसमयी तातडीची मदत उपलब्ध होईल.
तसेच पुरपरिस्थीतीमध्ये अरूंद पुलावरून वाहणा-या पाण्यातुन रस्ता ओलांडू नये तसेच वाहन चालविण्याचे धाडस करू नये ज्यामुळे पुराचे पाण्यात वाहुन जाण्याचा धोका संभावतो. तसेच जंगलातुन जाणारे वळण रस्ते, अरूंद घाट, अशा ठिकाणाहून वाहनासह प्रवास करणे पावसळयात टाळावे. अशा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडतात ज्यामुळे अशा ठिकाणी अडकून पडण्याचा धोका अधिक संभावतो, त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे.
शेतवस्तीवर राहणारे कुटूंबानी शेजारी राहणा-या व्यक्तीचे संपर्क क्रमांक स्वत: जवळ बाळगावे जेणे करून विज पडणे, झाड कोसळणे, नाले -ओढे यांना पुर येणे अशा नैसर्गिक आपदा प्रसंगी तातडीचे मदत वेळीच पोहच करणे शक्य होईल.
तसेच नागरिक हे नैसर्गिक सहलीचे दृष्टीकोनातुन पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाणासह, धरणे, धबधबे, पाण्याचे कुंड, इत्यादी ठिकाणी भटकंती करिता मोठया प्रमाणावर जातात. यावेळी वाहणा-या धबधब्याजवळ, डोंग-यातील द-या अशा विहंगमयी ठिकाणी तरुणाई मोठयाप्रमाणावर सेल्फी घेण्यासाठी पुढाकार घेतात.
निसर्गरम्य ठिकाणावरील सुरक्षा नियंमाचे पालन न केल्याने अनेक वेळा अशा ठिकाणी पाय घसरून पडुन अपघात होतात. ज्यामुळे प्राण ही गमवावे लागतात. यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे अगोदर संबधित जागेची/ ठिकाणाची पुरेशी माहिती घेणे अत्यावश्यक आहे. डोंगराळ भागातील रस्त्याची परिपुर्ण माहिती नसल्याने अपघात घडण्याची शक्यता अधिक असते.
शक्यतो पावसात डोंगर अथवा रानमाळावर जाणे कटाक्षाने टाळावे. त्याचप्रमाणे पावसळयात धबधब्याचे ठिकाणी जाऊ नये कारण धबधब्यात वरून पडणा-या पाण्याचा अंदाज बांधता येत नसल्याने पाण्याची आवक वाढल्यास अशा ठिकाणी पर्यटक अडकून पडतात. तसेच धरण क्षेत्राचे बॅकवॉटर, तलाव, कुंड इ. ठिकाणी पाण्याचा अंदाज नसल्यास पोहण्यासाठी पाण्यात जाऊ नये.
मा. पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊनये, घाबरून जाऊ नये, आप्तकालिन परिस्थीतीमध्ये तात्काळ स्थानिक पोलीसांशी किंवा नियंत्रणकक्ष औरंगाबाद ग्रामीण 0240-2381633, 2392151 या क्रमांकावर संपर्क साधावा.



