मालेगावमध्ये पोतं भरून तलवारी सापडल्या…

540

नाशिकः त्रिपुरा येथील कथित घटनेवरून होरपळून निघालेल्या मालेगावमध्ये चक्क पुन्हा एकदा एक पोतं भरून तलवारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी मालेगावमध्ये सापडलेला हा शस्त्रसाठा पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

मालेगावमधील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरात अपर पोलीस अधीक्षकांनी एका घरावर छापा टाकला. तेव्हा त्यांना एक पोतं भरून तलवारी मिळाल्या. मोहंमद बिलाल याच्या घरी या तलवारी ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी मोहंमद बिलासह महेमुद अब्दुल रशीदसह अजून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. एकूण 20 हजार रुपये या किमतीच्या 30 तलवारी आहेत. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश घुसर, हवालदार शेखर ठाकूर, पंकज डोंगरे, विशाल गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सावंत, रामेश्वर घुगे, हवालदार वसंत महाले, भूषण खैरनार, संदीप राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करून दंगल पेटवण्यात आली. त्यामुळे राज्यात अमरावती आणि नांदेडही पेटले. या हिंसाचारात मालेगावमध्ये अनेक दुकानांची राखरांगोळी करण्यात आली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. एकंदर मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. आता या तलवारी कशासाठी जमा केल्या होत्या, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी शहर पुन्हा एकदा पेटवण्याचा प्रयत्न होतोय का, असा प्रश्न आता यानिमित्ताने विचारला जात आहे. वर्षभरापूर्वीही मालेगावमध्ये 40 तलवारी सापडल्या होत्या. त्यात तलवारी राजस्थान येथून शहरात विकायला आणल्या होत्या. आता तलवारी कुठून आणल्या, कशासाठी आणल्या, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेने शहरातही खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here