कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): खासगी बसेसमधून प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक केली जाते. खासगी बसेसमधून होणाऱ्या मालवाहतुकीवर आळा घालण्यासाठी आज कोल्हापूर आरटीओच्या पथकांनी कारवाई केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.
कर्नाटक-गोवा राज्यात महाराष्ट्रातून जाणारी वाहने तसेच मुंबई पुण्याकडून कोल्हापुरात येणारी वाहने प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक करतात. आरटीओ पथकाने किणी टोल नाका, सीमा तपासणी नाका या ठिकाणी जोरदार कारवाई करून 21 वाहनांना प्रतिवेदन दिले आहे. खासगी बसेस या प्रवासी वाहतुकीसाठी असून मालवाहतुकीसाठी त्याचा वापर करणे कायद्याच्या कक्षेत बसत नसल्यामुळे सर्व खासगी बसेस मालकांना माल वाहतूक न करण्याचे आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. ही तपासणी मोहीम अशीच चालू राहील, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पत्रकाव्दारे कळविले आहे.
000000