
नगर : देशभरात नागरिक पावसाची (Rain) प्रतीक्षा करत आहे. मात्र पावसाळा संपत आला तरी राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही,असे असताना भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, राज्यात ५ सप्टेंबरनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.
कोकणात शनिवार (ता.३) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये तुरळक पाऊस बरसणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे शेतपिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील १७ दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र रविवार (ता. २) सकाळपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे खरीपातील कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यावर्षी खरीप हंगामात ८ लाख ५० हजार हेक्टर लागवड झाली आहे. तर रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मात्र आता राज्याच्या उर्वरित भागात पाऊस ५ सप्टेंबरनंतर पाऊस पडेल का ? असा प्रश्नच आहे.




