
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यात यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 92.05 टक्के इतके आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 98.11 टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के इतका आहे.या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,77,256 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in यावर जाहीर आहे.