Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८०६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात ४ ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. यासह राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता ४५४ इतकी झाली आहे. राज्यात काल ५,३६८ रुग्ण आढळले होते. रुग्णवाढीचा दर पाहता राज्यात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र समूह संसर्गाबाबत अधिकृतरित्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
राज्यात आज एकूण ८,०६७ रुग्ण आढळून आले आहेत. तर १७६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याशिवाय ८ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. राज्यात सध्या २४ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७.४६ टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. तर मृत्यू दर २.११ टक्के इतका आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात मुंबईची आखडेवारी धडकी भरवणारी आहे. राज्यातील एकूण ४५४ ओमायक्रॉन रुग्णांपैकी ३२७ रुग्ण एकट्या मुंबईतच आहेत. याशिवाय मुंबईत दिवसागणिक २ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मुंबईत काल २५१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याच चित्र आहे.