महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे संकट वाढणार?

523

सोमवारी महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून २० झाली आहे. ओमायक्रॉन प्रकाराचे एकूण ४० रुग्ण देशभरात आहेत. त्यातील २० रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटची देशातील निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आता ओमायक्रॉनचे संकट वाढणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. याआधी, दुसरी लाट निर्माण करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटच्या जवळपास निम्म्या केसेस बऱ्याच काळापासून महाराष्ट्रातून येत होत्या. तर महाराष्ट्रात करोना रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत.

सध्या देशातील ओमायक्रॉनच्या एकूण ४० रुग्णांपैकी २० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर राजस्थानमध्ये आतापर्यंत नऊ प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय कर्नाटक आणि गुजरातमध्ये ३-३ प्रकरणे आहेत. याशिवाय केरळ, आंध्र प्रदेश आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. राजधानी दिल्लीत सध्या ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले की, आम्ही ओमायक्रॉन प्रकाराला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. इतकंच नाही तर गरज भासल्यास दिल्लीतील ओमायक्रॉनशी लढण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लादले जाऊ शकतात, असंही ते म्हणाले.

सोमवारी पुण्यात ३९ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली असून, लातूरमधील रुग्ण हा ३३ वर्षांचा पुरुष आहे. दोघांचेही लसीकरण पूर्ण झाले होते. त्यांनी दुबई प्रवास केला होता. दरम्यान, राज्यात दिवसभरात करोनाच्या ५६९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत मुंबई १७४, पुणे जिल्हा १३२, मराठवाडा ४६, विदर्भात आठ नवे करोनारुग्ण आढळले.

दरम्यान, दुसरीकडे दुसऱ्या लाटेत करोनाची स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला आहे. महाराष्ट्र सरकार आणि संबंधित यंत्रणांनी ही स्थिती ज्या प्रकारे हाताळली ते पाहता राज्य देशात अग्रस्थानी राहिले हे आम्ही कुठल्याही संकोचाविना म्हणू शकतो, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि पालिकांच्या करोना व्यवस्थापनाचे कौतुक केले. तसेच करोना व्यवस्थापनातील त्रुटींशी संबंधित याचिका निकाली काढल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here