महाराष्ट्रातील मंदिरांवर चढणार समृद्धी आणि सुरक्षेचा कळस

    57

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या विकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील भाविक नियमितपणे ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा. मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा. या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची भविष्यातील संख्या लक्षात घेऊन दर्शन रांगांचे नियोजन, यात्रा उत्सव कालावधी लक्षात घेऊन मंदिर परिसरात प्रतिक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, निवासाची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर साफसफाई करणे, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, पार्किंग व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा, उपहारगृह यासह पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्याने राबवण्याचे निर्देशमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. स्थानिक नागरिक व प्रशासनाला विचारात घेऊन येथील कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

    ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकोर असावी, यासाठी खबरदारी घेण्यात यावी. अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित विकास कामे गतीने करावीत. पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणाऱ्या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here