मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं उत्तर, म्हणाले, ‘ते’ प्रकरण घडलं त्यावेळी सेवेतही नव्हतो

661

Mumbai Drugs case updates : नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या मेहुणीबाबत केलेल्या आरोपांनंतर वानखेडे यांनी या प्रकरणाशी त्यांचा संबंध कसा काय असू शकतो? असा प्रतिप्रश्न केलाय. हे प्रकरण झालं तेव्हा म्हणजे 2008 मध्ये आपण सेवेतही नव्हतो आणि क्रांती रेडकर यांच्याशी 2017 साली विवाह झाला, असं वानखेडे यांनी म्हटलंय. त्यामुळे या खटल्याशी आपला या प्रकरणाशी कसा संबंध असू शकतो, असा सवाल वानखेडे यांनी केला आहे.

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आधी नवऱ्यावर आरोप झाल्यानंतर आता क्रांतीच्या बहिणीवर देखील आरोप झाले आहेत.त्यामुळे क्रांती रेडकर आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप काल मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आज पुन्हा समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी आरोपांचा ‘सिलसिला’ कायम ठेवला आहे. 

Drugs Case : तुमची मेहुणी ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना सवाल

नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडेंना सवाल केला आहे.  समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा असं म्हणत ई कोर्ट सर्व्हिसेसवरील काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. नवाब मलिक यांनी म्हटलं की, ती महिला कोण तिच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. 

काल पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही, असंही ते म्हणाले होते. 

नवाब मलिक यांनी  म्हटलं होतं की, क्रूझ मध्ये जी केस बनवण्यात आली त्यामध्ये एक पेपर रोल बॉटल मिळाली होती. असं म्हणतात की ड्रग्ज घेण्यासाठी याचा वापर होतो. याचा मालक काशिफ खान आहे. त्याला आत्तापर्यंत अटक का झाली नाही. तो आमचे मंत्री अस्लम शेख यांना येण्यासाठी खूप फोर्स करत होता. तो व्यक्ती इतर देखील सेलिब्रिटींच्या मुलांना पार्टी मध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. यांचा असा तर प्लॅन नव्हता ना की मंत्र्यांना बोलवून त्यांना अशा प्रकरणात त्यांना अडकवायचं? असं मलिक यांनी म्हटलं होतं. 

नवाब मलिक यांनी  म्हटलं होतं की,  मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढत आहे. ड्रग्जच्या नावावर जी हजारो कोटी रुपयांची जी वसुली होत आहे त्यांच्या विरोधात मी लढत आहे. माझ्या जावयाने म्हटलं आहे की जर हे अशाप्रकारे चुकीच्या कारवाया करत असतील तर ही लढाई अशीच सुरू ठेवा. जर मला 20 वर्षे तुरुंगात राहावं लागलं तरी हरकत नाही, मात्र यांना सोडू नका, असं मलिक म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here