
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून शेकडो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलकांकडून रस्ते अडवणे, तसेच सरकारी कार्यालयांच्या बाहेर घोषणाबाजी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा आणि हैदराबाद गॅझेट या दोन्ही लागू करा अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे, पण याला कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे याबाबत कोणता दुसरा मार्ग सुचवला जाणार आहे का? असा प्रश्न विखे पाटील यांना विचारण्यात आला. ते म्हणाले की, कोणताही निर्णय करताना तो न्यायालयात टिकला पाहिजे, त्यासाठीच शासनस्तरावर विलंब लागत आहे. जरांगे पाटील यांचे ही मागणी मान्य केली आणि कोणीतरी न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती घेतली, तर हा प्रकार विनाकारण लाबंत जातो आणि गैरसमज होतात, असेही विखे पाटील म्हणाले.
थोडा वे लागला ही गोष्ट बरोबर आहे, पण उद्या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाताना हा निर्णय टिकला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्या बाजू तपासल्यानंतर तो मसूदा आम्ही मनोज जरांगे यांच्याकडे पाठवू, असेही राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.
मराठा आंदोलकांमुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना विखे-पाटील म्हणाले की, मी दोन दिवस जरांगे पाटील यांना आवाहन करतो आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले, सगळ्या जगामध्ये त्याचं आश्चर्य होतं की लक्षावधी लोकांचे मोर्चे निघाल्यानंतरही कुठेही गालबोट लागलं नाही, समाजाची बदनामी झाली नाही. आता जी काही मंडळी काही प्रकार करतात, रस्ते अडवणे असेल किंवा भारत सरकारच्या अस्थापनाच्या बाहेर जाणे आणि तेथे जाऊन घोषणाबाजी करणे यामुळे आरक्षण मिळत नाही किंवा प्रश्न सुटत नाही.
आज जरांगे स्वतः आझाद मैदानावर बसले आहेत, सर्व मराठा बांधवानी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि आंदोलनात सहभाग नोंदवला पाहिजे, असे राधाकृष्णविखे-पाटील म्हणाले. आझाद मैदानावर आंदोलन करणे गैर नाहीआपण मुंबईत आलो कशासाठी? मुंबईकरांचे हाल नको आहेत, आपलीही बदनामी नको आहे. आंदोलकांमुळे मुंबईत काही प्रमाणात परिणाम होईल, पण इतकं टीका करण्याचं काही कारण नाही. भावना व्यक्त करताना आझाद मैदानावर एकत्र येत असतील तर त्यात वावगं असं काही नाही. त्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे, असेही विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले.