
नगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय आला की, सत्ताधारी आपली जबाबदारी झटकून दुसऱ्याला जबाबदार धरण्याचे काम करीत आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाबाबत एकही बैठक घेतली नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी श्र्वेतपत्रिका काढून महाविकास आघाडीचे काम जनतेपर्यंत आणावे, असे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थाेरात (Balasaheb Thorat) यांनी केले.
संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सत्ताधारी मराठा आरक्षणासंबंधी दुर्लक्ष करीत आहे. मराठ्यांचे आंदाेलन मणिपूर, शेतकरी आंदाेलनासारखे माेडीत काढण्याचा त्यांचा डाव आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीची बैठक प्रत्येक १५ दिवसांना होत हाेती. सत्ताधाऱ्यांनी तसे तर काही काम केले नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमाला भाषणे ऐकायला गर्दी व्हावी, यासाठी शासनाच्या खर्च नाहक वाया घातला आहे.