
नेवासा : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ नेवासा (Newasa) येथे सकल मराठा समाज (Maratha Samaj) बांधवांचा मोर्चाद्वारे एल्गार पहावयास मिळाला. हजारोंच्या संख्येने निघालेल्या निषेध मोर्चामध्ये सर्वधर्मीय व सर्वपक्षीय बांधबांनी पाठिंबा दिला व मोर्चातही सहभाग नोंदवला. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आता सरकारने अंत पाहू नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नेवासा येथील श्री मळगंगादेवी मंदिर प्रांगणापासून मराठा क्रांती मोर्चाला प्रारंभ झाला.अग्रभागी घोड्यावर स्वार झालेले मावळे, त्यामागे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, हातामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज घेतलेले युवक युवती, ज्येष्ठ नागरिक असे या मोर्चाचे स्वरूप होते. “जालना येथे मराठा आरक्षण संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात मराठा समाज बांधवांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकार व प्रशासनाचा निषेध असो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय रहाणार नाही अशा घोषणा मोर्चाप्रसंगी देण्यात आल्या.
सदरचा मोर्चा खोलेश्वर गणपती चौक, नगरपंचायत चौक, मुख्य पेठेसह डॉ. हेडगेवार चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक,औदुंबर चौक मार्गे श्रीरामपूर रोडवर मार्गे पुन्हा श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात आला. याठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हजारोंच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना आरतीद्वारे अभिवादन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अँड.अण्णा साहेब अंबाडे यांनी आलेल्या हजारो समाज बांधवांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी सोनई येथील स्नेहल दरंदले, पूनम दरंदले, ऋतुजा रौंदळ, श्रावणी कर्डिले, तेजल गोसावी, साक्षी उभेदळ, ऋतुजा कोकणे, राणी दरंदले, सुहानी भिंगारदे, राहुल पेरणे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित हजारो बांधवांना मंत्रमुग्ध केले.यावेळी दिलेल्या निवेदनात मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, कोपर्डीतील आरोपींना फाशी द्यावी, जालन्यातील घटनेचा तपास सीआयडी कडे सोपवावा, आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या प्रशासनातील दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबित करण्यात यावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना देण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीताने मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली. नेवासा फाटा येथील व्यापारी बांधवांनी मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शवत स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळला.





