मराठवाडा गारठला, परभणीत पारा 7 अंशांवर, आणखी किती दिवस राहणार थंडीची लाट?

546

औरंगाबादः मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यातील तापमान हळू हळू घसरू लागले असून थंडीचा जोर चांगलाच वाढतोय. काल दिवसभर नागरिकांना हुडहुडी भरल्याची जाणीव होत होती. तसेच सकाळच्या वेळी तसेच सायंकाळच्या वेळी थंड वारे सुटत असल्याने हे वारे अधिक झोंबणारे वाटत आहे.

परभणीचा पारा मराठवाड्यात सर्वात खाली घसरला आहे. बुधवारी परभणीत नोंदवलेले 7.० अंश सेल्सियस हे तापमान या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान आहे. परभणी शहर आणि परिसरात सकाळच्या वेळी दाट धुक्यांची चादर पहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस तापमानातही घट होताना दिसत आहे. परभणीनंतर नांदेडमधील तापमान घसरलेले दिसून येत आहे. नांदेडमध्ये पारा  9 ते 8 अंशांपर्यंत घसरला. औरंगाबादेतही तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याचे दिसून आले.

मराठवाड्यात यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच एवढी थंडी पडू लागल्याने ग्रामीण भागात, तसेच शहरातील कॉलनी परिसरात ठिक-ठिकाणी शेकट्या पेटवल्या जात आहेत. शहरात संध्याकाळ नंतर बहुतांश नागरिक घरातच राहणे पसंत करतायत. तर बाहेर पडलेले लोक मसाला चहा आणि मसाला दूधाच्या स्टॉलवर चहा आणि दूधाचा आस्वाद घेत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने बीड जिल्ह्यात हवेत गारठा पसरला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध भागात ढगाळ वातावरण पहावयास मिळाले. अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे थंडी वाढली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी माजलगावसह जिल्ह्यातील नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.

एरवी हिवाळा सुरु होतो तेव्हा नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते. पण या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माम झाल्याने मराठवाड्यात अनेक दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापामानातही वाढ झाली होती. आता ढगांचे सावट दूर झाल्याने तापमान घसरू लागले असून थंडीचा जोरही वाढत आहे.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञ कैलास दाखोरे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसात थंडीचा जोर कमी होत जाईल आणि हळू हळू तापमानातही वाढ होत जाईल.

रबी हंगामातील गहू, करडी, हरभरा आदी पिकांच्या वाढीसाठी ही थंडी पोषक असल्याचे दाखोरे यांनी सांगितले. त्यामुळे वाढलेली थंडी ही रबी पिकांसाठी आरोग्यदायी व चांगले लक्षण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here