
नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation) मागणीसाठी जालन्यातील (Jalna Protest) आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज तब्बल अकरावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं,अशा विनंतीचं पत्रही राज्यसरकारने दिले आहे. मात्र जरांगे-पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागण्यांसंदर्भात सरकारचा अजून निरोप आलेला नाही, उद्या माझ्या अल्टीमेटम नुसार शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत निरोप न आल्यास सलाईन काढणार, पाणी बंद करणार” असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जरांगे यावेळी म्हणाले, सरकारसाठी आम्ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता. मात्र अजून सरकारचा निरोप नाही. आज आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पाहत आहे. सरकारसाठीच मी सलाईन घेतलं. उद्या शेवटचा दिवस आहे. यानंतर हे सर्व बंद करणार आहे. सलाईन काढणार आणि पाणी देखील सोडणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.
सरकारच्या जीआरमधून वंशावळी शब्द वगळून त्याऐवजी सरसकट मराठा समाज टाकावा, या मागणीसाठी मनोज जरांगे हे आपलं उपोषण सुरूच ठेवणार आहे. सरकारने कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर काढला. त्यातील वंशावळी शब्दाला जरांगे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्रही सरकारकडून देऊनही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. मनोज जरांगे यांचं शिष्टमडळ आज मुंबईत येऊन सरकारशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात १६ ते १७ सदस्य असणार आहेत. ज्यात अभ्यासक, आंदोलक आणि शेतकऱ्यांचा समावेश असेल. हे शिष्टमंडळ मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याबाबत सरकारसोबत चर्चा करणार आहे.