
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या माजी खासदार, आमदार यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यांच्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी बाजी मारली आहे.
पठारे यांच्याकडे एकूण २७१ कोटी ८५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यापाठोपाठ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांची मालमत्ता आहे. वांजळे यांच्याकडे ७७ कोटी ६५ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
महापालिकेची निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांधून ही माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ४१ प्रभागातून १६५ जागांवर उमेदवारी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरेंद्र पठारे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार असलेल्या बापू पठारे यांचे सुरेंद्र चिरंजीव आहेत. सुरेंद्र यांच्या भाजप प्रवेशासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातले होते. सुरेंद्र याचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते. त्यामुळेच पठारे यांच्यासह त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे, तसेच आणखी एका एका नातेवाईकांना भाजपने उमेदवारी दिली आहे.


