
नगर तालुका (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात मूर्तीच्या चौथऱ्यावर पाठीमागील बाजूस अज्ञात समाज कंटकाने मांसाचे तुकडे ठेवून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस येवून ३ दिवस झाले तरी आरोपींचा तपास लागलेला नाही. या आरोपींना तातडीने पकडण्यात यावे अन्यथा नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत नगर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक शिरीष वमने यांना निवेदन देण्यात आले आहे.
मंदिरात विटंबना करून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार २२ सप्टेंबर रोजी सकाळी निदर्शनास आला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरलेले आहे. गावच्या वेशीबाहेरच पुर्वामुखी हनुमान मंदिर आहे.
या ठिकाणी सकाळी दर्शनाला गेल्यावर हा प्रकार काहींच्या निदर्शनास आला. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले, अनेक ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने मंदिराजवळ जमा झाले. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते हे मोठ्या फौजफाट्या स.पो.नि. प्रल्हाद गिते हे मोठ्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले.काही वेळातच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक शिरीष वमने हे ही फौजफाट्यासह गावात आले. रॅपीड अॅक्शन फोर्स ची तुकडीही आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर ग्रामस्थांनी आक्रमक पणे आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आरोपीला तातडीने पकडण्याची मागणी केली. पोलिस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन करत आम्ही तपास सुरु केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात विष्णु विजय खोसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास स.पो.नि. प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहेत.
गावात इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने गावातील शांतता, ऐक्य व बंधुभाव याला बाधा आणण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेला ३ दिवस झाले तरी आरोपीचा शोध न लागल्याने २४ सप्टेंबर रोजी ग्रामस्थ गावात एकत्र जमा झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्याचा निर्णय घेत नगर गाठले. पोलिस अधिक्षक दौऱ्यावर असल्याने पोलिस उपअधिक्षक शिरीष वमने यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.