
नगर : मंत्रालय (Mantralaya ) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat) देण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे करुन दिले नाही, तर मंत्रालयात ठेवलेल्या बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी कॉलवर दिली आहे. विशेष बाब म्हणजे हा निनावी फोन अहमदनगर (Ahmednager) मधून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
बाळकृष्ण ढाकणे असं या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो नगर येथे राहणारा आहे. निनावी कॉल आल्याच्या काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली आहे. त्वरित मंत्रालयात बॉम्ब शोधक दाखल झाले आहे. मागच्या १५ दिवसांत धमकीचा हा दुसरा फोन आहे. त्यामुळे मंत्रालय आणि आजुबाजूच्या परिसराची कसून चौकशी केली जात आहे. मंत्रालयामध्ये डॉग स्क्वॉड देखील दाखल झालं आहे.
या धमकीच्या फोननंतर मंत्रालयाच्या संपूर्ण परिसराची आणि इमारतीची तपासणी केली असता बॉम्ब कुठेच नसल्याची पोलिसांनी खात्री केली. कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांनी घाबरुन जावू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.