
नगर : जस-जशा निवडणुका जवळ येत आहेत, तशा राजकीय घडामोडींना वेग येत आहेत. भाजप (BJP) विरोधात एकवटलेल्या ‘इंडिया’ (India) या आघाडीतील नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. बैठकीसाठी देशभरातून २७ पक्षांचे प्रमुख नेते हजेरी लावणार आहेत. परंतु, या बैठकीला येणाऱ्या नेत्यांनाही मुंबई (Mumbai) फिरण्याचा मोह आवरत नसल्याचे निदर्शनास येत आहे. काही नेते सहकुटुंब देवदर्शनाच्या, तर काही शॉपिंगच्या तयारीत येत आहेत.
मुंबईत इंडियाची बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या नेत्यांनी मुंबई फिरण्याचीही योजना आखली आहे. त्यासाठी ते कुटुंबासह मुंबईत येणार आहेत. कुणाला देवदर्शन करायचंय तर कुणाच्या फॅमिलीला शॅापिंगला जायचंय तर काही जणं मुंबईत पर्यटनाचाही प्लॅन करत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत अंबांनीपासून ते बिग बी अमिताभ बच्चनपर्यंतचे बॅालिवूड, अथांग समुद्र, मुंबईतली विविध मंदिरं पाहण्याचा मोह नेत्यांच्या कुटुंबियांना असणारच, त्यामुळे कुणाला मुंबादेवीचं दर्शन घ्यायचे, तर कुणाला सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याचे प्लॅनिंग सुरु आहे.
इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण
देशातील इंडिया आघाडीमधील पक्षातील नेत्यांचं ३१ ऑगस्टला सायंकाळी सहा ते साडेसहा वाजता मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल मध्ये स्वागत केले जाणार आहे. ३१ ऑगस्ट साडे सहा नंतर पुढे इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरण व अनौपचारिक बैठक होणार आहे. ३१ ऑगस्टला रात्री आठ वाजता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देशभरातून आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी खास जेवणाचे आयोजन केले आहे. १ सप्टेंबर सकाळी १० वाजता इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातले एवढं सगळे नेते एकत्र येणार आहे. पण या सर्व नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची व त्यांच्या परिवाराच्या व्यवस्थेची चिंता आयोजकांना सतावत आहे. कारण जवळपास १५० पेक्षा जास्त नेते या बैठकीत सहभागी होणारआहेत. त्यापैकी काही नेते आपल्या कुटुंबियांसह येण्याचा प्लॅन करत आहे. त्यामुळे आयोजकांची डोकुदुखी वाढत चालली आहे.





