भारतीय आयटी क्षेत्राचे दिग्गज फकिर चंद कोहली यांचं निधन
भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज फकिर चंद कोहली यांचं वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. कोहली हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
असा झाला प्रवास..
फकिर चंद कोहली यांचा जन्म 19 मार्च 1924 रोजी पेशावरमध्ये झाला. 1948 मध्ये त्यांनी कॅनडातील क्विन विद्यापीठातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये बीएससी (ऑनर्स) शिक्षण पूर्ण केलं.
1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले आणि सिस्टमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली.
1970 मध्ये कंपनीच्या संचालकपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावर टीसीएसच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली. 1999 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी ते निवृत्त झाले.
निवृत्तीनंतरही टीसीएसचे सल्लागार म्हणून 1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता.
टीसीएसचे सीईओ म्हणून कोहली यांनी देशाला 100 अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.