भारतातील बेरोजगारीचा दर 6.57 पर्यंत घसरला; महाराष्ट्रात 4.2 टक्के तर हरयाणात सर्वाधिक 24.4 टक्के दर

315

नवी दिल्ली: भारतातील बेरोजगारीचा दर घसरला असून तो 6.57 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या Centre for Monitoring Indian Economy (CMIE) एका अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. जानेवारीमधील बेरोजगारीचा 6.57 टक्के दर हा मार्च 2021 नंतरचा सर्वात कमी दर आहे. कोरोनाची लाट, नंतर आलेले ओमायक्रॉन व्हेरियंटचे संकट यातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत असून त्याचा परिणाम म्हणजे बेरोजगारीचा दर कमी झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील जानेवारी महिन्यातील बेरोजगारीचा दर हा 4.2 टक्के इतका आहे. 

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 मध्ये देशातील शहरी भागात बेरोजगारीचा दर हा 8.16 टक्के इतका आहे तर ग्रामीण भागातील हा दर 5.84 टक्के इतका आहे. डिसेंबर 2021 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा 7.91 टक्के इतका होता. डिसेंबर 2021 मध्ये बेरोजगारीचा दर हा शहरी भागात 9.30 टक्के आणि ग्रामीण भागात 7.28 टक्के इतका होता. 

बेरोजगारीच्या प्रमाणाचा विचार करता तो तेलंगणा (0.7 टक्के) राज्यात सर्वात कमी आहे तर हरयाणामध्ये (23.4) तो सर्वाधिक आहे. गुजरातमध्ये हा दर 1.2 टक्के, मेघालयमध्ये 1.5 टक्के ओडिशामध्ये 1.8 टक्के तर राजस्थानमध्ये 18.9 टक्के इतका आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 53 दशलक्ष इतके बेरोजगार लोक होते आणि त्यापैकी महिलांची संख्या ही मोठी होती असं CMIE ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here