
तुम्ही दररोज गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम वापरता का ? तुमच्यासारख्या करोडो लोकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती या कंपन्यांकडे जमा होते. पण ही माहिती सुरक्षित आहे का ? असा एक मोठा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI च्या एका अहवालाने निर्माण केला आहे.
SBI नुसार भारताला आपल्या UPI व्यवहारांच्या डेटाची सुरक्षा करायची असेल तर परदेशी कंपन्यांच्या अॅप्सवर अवलंबून न राहता स्वतःचा देशी UPI अॅप तयार करण्याची गरज आहे. सध्या आपल्या देशात UPI व्यवहारांवर गुगल पे, फोनपे आणि पेटीएम यांचे वर्चस्व आहे. जुलै 2025 मध्ये याच तीन अॅप्सनी एकूण 22 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार केले.
या कंपन्यांमध्ये मोठी परदेशी गुंतवणूक असल्याने आपल्या देशातील आर्थिक डेटा बाहेरच्या कंपन्यांच्या हातात जात आहे. ही गोष्ट भारताच्या भविष्यातील डेटा सुरक्षिततेसाठी चिंतेची आहे. काही मोजक्या अॅप्समध्येच सर्व व्यवहार जमा झाल्यामुळे आपल्या देशातील फिनटेक कंपन्यांना पुढे जाण्यासाठी अडचणी येऊ शकतात. कारण डिजिटल कर्ज किंवा विम्यासारख्या नवीन सेवांसाठी डेटा सर्वात महत्त्वाचा असतो.
आणि हा डेटा जर परदेशी कंपन्यांच्या हातात असेल तर भारताच्या गरजांनुसार नवीन गोष्टी तयार करणे कठीण होईल. म्हणूनच SBI म्हणते की भारताला आपल्या गरजांनुसार काम करणारे आणि देशाचा डेटा सुरक्षित ठेवणारे देशी अॅप हवे आहे. असे अॅप आल्यास आपला डेटा तर सुरक्षित राहीलच पण आपल्या देशातील तंत्रज्ञानालाही मोठी चालना मिळेल.



