चंदीगड : भारताचे प्रसिद्ध धावपटू आणि फ्लाईंग सिख (Flying Sikh) या नावाने प्रसिद्ध असणारे मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ते चंदीगड येथे आपल्या घरीच उपचार घेत होते. दरम्यान त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्याने त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना रुग्णालयात थांबावं लागणार आहे.
मिल्खा सिंग यांचा मुलगा दुबईहून भारतात दाखल
मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंग याला याबाबतची माहिती मिळताच तो दुबईतून चंदीगड येथे परतला होता. दरम्यान त्याने PTI ला आपल्या वडिलांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, बाबांना आशक्तपणा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिवसभर काही खाल्ले देखील नसल्याने आम्ही त्यांना रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.