भारताची इंधन गरज आम्ही भागवू! आणखी एका देशाची ऑफर; ‘समजूतदार’ मित्र मदतीला धावला

610

नवी दिल्ली: युक्रेन आणि रशिया युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय तेल बाजारात पाहायला मिळत आहेत. खनिज तेलाचे दर वाढले आहेत. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियावर अमेरिकेसह युरोपियन देशांनी निर्बंध लादले. त्यामुळे रशियाचं आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर रशियानं भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर आता आणखी एका देशानं भारताला प्रस्ताव दिला आहे.

भारताला खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी इराणनं एक खास प्रस्ताव दिला आहे. आमच्याकडून तेल खरेदी करा. आपण रुपया आणि रियाल पद्धतीद्वारे व्यवहार करू, असा प्रस्ताव इराणनं दिला आहे. भारतातले इराणचे राजदूत अली चेगेनी यांनी हा प्रस्ताव दिला आहे. भारताच्या उर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करू, असं चेगेनी म्हणाले.

दोन्ही देशात रुपया-रियालच्या माध्यमातून होणारे व्यवहार पुन्हा सुरू झाल्यास द्विपक्षीय व्यापार ३० अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा विश्वास चेगेनी यांनी व्यक्त केला. इराण भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार होता. मात्र अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लादले. त्यांच्या खनिज तेल निर्यातीवर प्रतिबंध लादले. त्यामुळे भारताला इराणसोबतचे तेल व्यवहार रोखावे लागले.

रुपया-रियालच्या माध्यमातून व्यवहार झाल्यास दोन्ही देशांच्या कंपन्यांना त्याचा फायदा होईल, असं चेगेनी म्हणाले. भारताला रुपयामधून तेल व्यवहार करण्याची मुभा देणारा इराण हा एकमेव देश आहे. इतर सर्व देशांना भारताला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. याशिवाय इराण भारताला काही दिवसांचं क्रेडिटही देतो. त्यामुळे इराणकडून तेल खरेदी केल्यावर भारताला लगेच पैसे द्यावे लागत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here