भाजप पक्षाने आमचा विश्वासघातच केला :माजी मंत्री महादेव जानकर
भाजप पक्षाने आमचा विश्वासघातच केला आहे, या म्हणण्यावर मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
नगरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ते आले असता ते बोलत होते. जानकर म्हणाले की, भाजप जिंतूर व दौंडची जागा आम्हाला देणार होते. मात्र त्यांनी ती जागा आम्हाला दिली नाही. याचा जाब आता भाजपच्या नेत्यांना विचारला पाहिजे. मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे, या मतावर मी आजही ठाम आहे आणि उद्याही राहणार आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. केंद्र व राज्याच्या निवडणुकीत, सत्तेत त्यांच्याबरोबर आहोत. मात्र, स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रमध्ये भाजप बरोबर होतो, त्या वेळेला सुद्धा आम्ही स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलो आहोत. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावरच निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये आज पाच राष्ट्रीय पक्ष आहेत. आम्हाला सुद्धा राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली पाहिजे, या उद्देशाने आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवत आहोत. येणाऱ्या उत्तरप्रदेश निवडणूक मध्ये निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, असेही जानकर यांनी यावेळी सांगितले.
सध्या राज्यामध्ये ईडी व इतर चौकशाचा ससेमिरा सुरू झाला आहे, यावर विचारले असता जानकर यांनी ज्यांना कर नाही त्याला डर कशाला, असे सांगत काँग्रेसनेही सत्तेचा वापर अशाच पद्धतीने केला होता, तसाच वापर आता भाजप करत आहे. हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. पण एखाद्यावर विनाकारण आरोप करून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार असेल, तर ते योग्य नाही. विनाकारण त्रास देण्याची प्रवृत्ती आहे, ती योग्य नाही. केंद्र सरकारने सुद्धा याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असा टोलाही जानकर यांनी यावेळी लगावला.
माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचे कारखान्याचे लायसन रद्द झाले व ते लायसन परत मिळावे, या उद्देशाने मी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट दिली. मात्र याला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या काळामध्ये माणसं जगविणे, हे सरकारपुढे आव्हान होतते. त्यामुळे त्यामध्ये सरकारचा बराच वेळ गेला. महाविकास आघाडीने त्यानंतर थोडेफार काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सरकारच्या कामकाजाबाबत आत्ताच तुलना करू शकत नाही, असे जानकर यांनी यावेळी सांगितले.
पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत, यावर विचारले असता, त्या नाराज आहेत असे वाटत नाही. जर बहिणीला सासुरवास होत असेल तर ती निश्चितच माहेरी सांगत असते. त्यांनी काही मला तसेच सांगितले नाही. त्या जेव्हा माझ्या कानात सांगतील, त्यावेळेला मी त्यांना सल्ला देईल, असेही जानकर यांनी सांगितले.





