भागवत कराड आणि माझी तुलना होऊच शकत नाही; त्यांच्या पेक्षा माझी उंची खूप मोठी – चंद्रकांत खैरे.
केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतलेले औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खोचक टीका केली आहे. भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं, मीच त्यांना महापौर केलं, कराडांपेक्षा मी खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना कधीच नाही होऊ शकत, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय.
शिवसेनेला शह देण्यासाठी जर कोणी कराडांना मंत्री केलं असेल तर चांगलंच आहे. या अगोदर पण असे खूप प्रयत्न झाले पण शिवसेना ही मराठवाड्यात आपले पाय भक्कम रोवून उभी आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यांना भाजपने आमच्या विरोधात लोकसभेचं तिकीट दिलं तरी आम्हाला आनंद आहे, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.
मी दिल्लीत गेलो होतो. पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. ते येतील मला भेटायला. ते मला नेताच मानतात. मी त्यांना खूप सीनियर आहे, असं ते म्हणाले. मला ज्यांनी पाडलं त्या दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता. त्यांचं काय अभिनंदन करायचं, असंही ते म्हणाले.