
बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवून कर्कश आवाज करीत अनेक बुटेलस्वार दादा, भाई, भाऊ शहरभर फिरत असतात. त्यांना अहिल्यानगर पोलिसांनी आता दणका दिला आहे. अहिल्यानगर शहरात पोलिसांनी अशा बुलेटस्वारांविरूद्ध कारवाई सुरू केली. कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कँप पोलिस ठाण्यांतील कारवाईत मिळून एकूण १३१ सायलेन्सर जप्त करण्यात आले.
जप्त केलेल्या या सायलेन्सरवर पोलिसांनी आज रोडरोलर फिरविला. शहरातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या शेजारील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कानठळ्या बसविणारा आवाज करीत शहरभर फिरणाऱया बुलेटचे सायलेन्सर चिरडले जात असल्याचे पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




