
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतरांसह एनडीएचे वरिष्ठ नेते पाटण्यातील गांधी मैदानावर उपस्थित आहेत. भोजपुरी स्टार अभिनेता-गायक मनोज तिवारी आणि पवन सिंह देखील यावेळी उपस्थित आहेत. या शपथविधी सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा भरघोस मतांनी विजय झाला. या निवडणुकीत एनडीएने एकूण २०२ जागा जिंकल्या. यामध्ये भाजपने ८९ जागा जिंकल्या. तर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड ८५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने १९ जागा जिंकल्या. तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.
नितीश कुमार यांच्यासोबत कुणी-कुणी मंत्रिपदाची शपथ घेतली
-सम्राट चौधरी – उपमुख्यमंत्री
विजय कुमार सिन्हा – उपमुख्यमंत्री
मंगल पांडे
डॉ. दिलीप जयस्वाल
नितीन नबीन
रामकृपाल यादव
संजय सिंग ‘टायगर’
अरुण शंकर प्रसाद
सुरेंद्र मेहता
नारायण प्रसाद
राम निषाद
लखेंद्र पासवान
श्रेयसी सिंग
डॉ. प्रमोदकुमार चंद्रवंशी (आमदार)




