बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

    34

    पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळ मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी सुमारे ४ वाजता शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. मयत महिलेचे नाव सौ. भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय ७०, रा. किन्ही, ता. पारनेर) असे आहे.

    प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, भागूबाई या आपल्या शेतात एकट्याच काम करत होत्या. अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पोहोचू शकले नाही आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या जंगलाकडे पळाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पारनेर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली.

    किन्ही परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हालचाली वाढल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही जनावरे मारण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ बिबट्या पकडण्याची मागणी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here