बिबट्याच्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्या यांचे पती ठार!
आष्टी, ता. 24 (बातमीदार) – बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी व मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा नागनाथ गर्जे यांचे पती नागनाथ गहिनीनाथ गर्जे (वय 34 वर्षे) हे जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्त झालेल्या मिळालेल्या माहितीनुसार नागनाथ गर्जे हे मंगळवारी दुपारी सुरुडी येथील त्यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. अंधार पडण्याची वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने गावातील काही लोक त्यांना शेतात पाहण्यासाठी गेल्यानंतर नागनाथ गर्जे हे गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत कोसळलेले आढळून आले. त्यांच्या तोंडावर ओरबाडून व चावा घेतल्याने शीर धडासमवेत लोंबकळत असल्याचे आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी ऴसकाळऩशी बोलताना सांगितले.
आष्टी तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या पाथर्डी (जि. नगर) तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असताना ता. 5 नोव्हेंबर रोजी वनविभागाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले होते.
यानंतर सुरुडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात होते. आज घडलेल्या या घटनेने यावर शिक्कामोर्तब झाले असून यामुळे सुरुडी व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागातील अधिकार्यांनी शोधमोहीम राबवून तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.