फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देणार्‍या सर्व बँका व पतसंस्थेतील कर्मचारींचे कोरोना लसीकरण करावे शिवसेना, जिल्हा अग्रणी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने उपायुक्तांना निवेदन

783


अहमदनगर(प्रतिनिधी)- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शिवसेना, जिल्हा अग्रणी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थाक संदीप वालवकर, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक अभिनव कुमार उपस्थित होते.
राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. तसेच लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचनाही प्रसारित केल्या आहेत. राज्य शासनाच्या 13 एप्रिलच्या ब्रेक द चेन या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन ते सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित असल्याने या मधील कर्मचार्‍यांचा शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे जनतेशी संपर्क असतो. सध्या सर्व बँक व पतसंस्थेचे कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. अनेक बँक कर्मचारींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा यामध्ये जीव देखील गेला आहे. तरी देखील सर्व कर्मचारीची सेवा अविरत सुरु असून, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांचे लसीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था नागरिकांची आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत आहे. तसेच कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिक दैनंदिन उदरनिर्वाह, कौटुंबिक खर्च व वैद्यकिय खर्चासाठी तर ज्येष्ठ नागरिक पेन्शनची रक्कम काढण्यासाठी जात आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये देखील भिती निर्माण झाली आहे. मात्र पैश्यासाठी नाईलाजाने त्यांना बँकेत जावे लागते. बँकेत अपुरे कर्मचारी असल्याने बँकेवर ताण वाढला आहे. लसीकरणासाठी रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात वेळ जात असल्याने काम सोडून कर्मचार्‍यांना लसीकरणासाठी जाता येत नाही. नागरिकांची आर्थिक अडचण निर्माण होऊ नये व बँक सुरळीत सर्व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये सुरु राहण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बँक कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून नागरिकांना सेवा देत आहे. त्यांचे लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यांना विशिष्ट वेळ देऊन कमी वेळेत लसीकरण करुन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आयुक्तांशी चर्चा करुन उपाययोजना केल्या जाणार असल्याचे आश्‍वासन उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांनी शिष्टमंडळास दिले.

बँक कर्मचारींची सेवा कोरोनाच्या संकटकाळात अविरत सुरु आहे. कोरोनाने अनेक कर्मचारींचा जीव गेला आहे. कामाच्या व्यस्त वेळेतून त्यांना दिवसभर रांगेत उभे राहून लस घेणे अशक्य असून, महापालिका प्रशासनाने नियोजन करुन त्यांचे लसीकरण करुन द्यावे. – आनंद लहामगे (शिवसेना, जिल्हा उपप्रमुख)

बँक कर्मचारींचा दररोज अनेक व्यक्तींशी संपर्क येत आहे. जीव मुठित घेऊन ते सेवा देत असताना त्यांचे लसीकरण झाल्यास भिती न बाळगता ते काम करु शकतील. -संदीप वालवकर (जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थाक)


वैद्यकिय खर्च असो किंवा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी नागरिक बँकेत धाव घेत आहे. अनेक कर्मचारी कोरोनाने बाधित झालेले असून, अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बँक कर्मचारींचे लसीकरण झाल्यास, मनुष्यबळ वाढवून नागरिकांना सेवा देता येईल. -अभिनव कुमार (सेंट्रल बँक व्यवस्थापक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here