
अहमदनगर अहमदनगर मधील फकीरवाडा परिसरात रविवारी (दि. ४) रात्री दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदल उरुस मिरवणुकी मध्ये मुगल सम्राट औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक झळकावण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झाला असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, फकीरवाडा परिसरात रविवारी (दि. ४) रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदंल उरुस मिरवणुकीमध्ये यातील आरोपी यांनी संगनमताने मुगल सम्राट औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेऊन प्रदर्शन करुन ‘बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन, द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार (रा. दर्गादायरा ), अफनान आदिल शेख उर्फ खडा (रा.वाबळे कॉलनी), शेख सरवर (रा. झेंडीगेट), जावेद शेख उर्फ गब्बर (रा. आशा टॉकीज चौक) यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ५०५ (२), २९८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे