पैशाच्या वादातून एका इसमाचा मारहाणीत मृत्यू८ आरोपींना अटक, एक पसार
अहमदनगर राहाता तालुक्यातील एकरुखे गावांमध्ये पैशाच्या कारणावरून ५२ वर्षीय इसमास जबर मारहाण करण्यात आली. यातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने राहाता पोलिसांत ९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात महेश दिलीप आभाळे (वय ३४) याने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १५ सप्टेंबर रोजी सकाळी मयत दिलीप रंगनाथ आभाळे व त्याचा मित्र निवृत्ती चांगदेव क्षीरसागर दुचाकीवर गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाटा येथे यातील आरोपी व दिलीप आभाळे यांच्यात पैशाच्या कारणावरून बाद झाला. काहीवेळानंतर आरोपींनी आपल्या साथीदारांना वाद झाल्याची माहिती दिली. त्यांचे साथीदार हे काही वेळानंतर एकरूखे येथे येऊन किराणा दुकानासमोर दिलीप आभाळे उभे होते. त्याठिकाणी अभिजीत उर्फ गोट्या पवार, गौरव उर्फ सनी पवार, अरबाज उर्फ अर्जुन शहा, राहुल सोनकांबळे, सचिन जाधव उर्फ सचिता तमन्ना पवार, विकास धनवटे उर्फ रूपाली शेख, आनंद फौजी शेलार उर्फ रुचिरा शेख, लक्ष्मण वायकर उर्फ लक्ष्मी शेख, हे सर्व राहणार खंडाळा, ता. श्रीरामपूर येथील आहेत. तर इरफान शहा पत्ता माहीत नाही. या आरोपींनी आभाळे यांना पैशाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जबर दुखापत केली. दरम्यान गावातील लोकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मारहाण झाल्यानंतर जखमी दिलीप आभाळे यांनी दोन दिवस घरीच उपचार घेतले; परंतु त्यामध्ये सुधारणा न झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राहाता पोलिसांनी अभिजीत उर्फ गोट्या पवार, गौरव उर्फ सनी पवार, अरबाज उर्फ अर्जुन शहा, राहुल सोनकांबळे, सचिन जाधव उर्फ सचिता तमन्ना पवार, विकास धनवटे उर्फ रूपाली शेख, आनंद फौजी शेलार उर्फ रुचिरा शेख, लक्ष्मण वायकर उर्फ लक्ष्मी शेख, हे सर्व राहणार खंडाळा ता. श्रीरामपूर या आठ आरोपींना अटक केली आहे. भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती कळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे व शिर्डीचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करत आहेत.