Maharashtra Paper Leak Case : पेपर फुटी प्रकरणी आज आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार करून सेवेत आलेले सुमारे 250 ‘वर्ग ब’चे अधिकारी तपासात आरोपी ठरूनही शासकीय सेवेत आहेत. यांत तहसीलदार, विस्तार अधिकारी, पोलीस निरीक्षक, कर सहाय्यक, कर सल्लागार, विक्रीकर निरीक्षक असे अधिकारी आहेत.
राज्यामध्ये सध्या गाजत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणाचा एबीपी माझानं चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा करत आहोत. 2016 च्या जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यातल्या मांडवी येथे राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार होत असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या पहिल्याच गुन्ह्यांमध्ये डमी उमेदवार बसवणं, तसेच एका उमेदवराच्या मागे आपल्याला हवा तो दुसरा उमेदवार बसवणं आणि पेपर फोडणं, असे प्रकार उघड झाले होते.
MPSC परिक्षेतल्या गैरप्रकाराचे रॅकेट 2009 सालापासून सुरु होते. 13 टोळ्या यांत काम करत होत्या. यातून मुख्य आरोपीने सुमारे 100 कोटींची संपत्ती जमा केली होती.
कर सहाय्यक, पोलीस निरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, विस्तार अधिकारी, वसतीगृह अधीक्षक, कृषी विस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी या पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या सगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 53 गुन्हे राज्याच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत दाखल झाले होते. यवतमाळ, नांदेड, पुणे शहरातील डेक्कन, मुंबईतील माटुंगा, शिवाजी पार्क, औरंगाबाद मधलं सिडको, कोल्हापुरातील गगनबावडा, नांदेडात तीन गुन्हे, मुंबईमध्ये भायखळा, मरीन ड्राईव्ह, साताऱ्यातील, एक हिंगोलीचा एक गुन्हा आणि लातूरमध्ये एक गुन्हा असे मिळून एकूण 53 गुन्हे दाखल झाले होत. या 53 गुन्ह्यांमध्ये मिळून सुमारे 250 ‘ब वर्ग’ बोगस अधिकारी उघड झाले.या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालं आहे. परंतु अनेक प्रकरणांमध्ये अजूनही तपासच सुरु आहे. मुख्य आरोपीला अटक झाली. परंतु, ज्यांनी हा गैरप्रकार करून ‘वर्ग ब’ची पदे मिळवली, असे काही तहसीलदार गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी पोलीस निरीक्षक यांना अद्याप अटक झालेली नाही. हे सर्व अधिकारी अद्यापही पदावर आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 मार्च 2017 या दिवशी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका एसआयटीची घोषणा केली होती. या एसआयटीने काही प्रकरणांमध्ये तपास करून गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणांमध्ये तपास होऊन जे गुन्हेगार आहेत, म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल झाली, असे ‘वर्ग ब’चे अनेक अधिकारी यामध्ये तहसीलदार विस्तार अधिकारी पोलीस निरीक्षक कर सहाय्यक, कर सल्लागार, विक्रीकर निरीक्षक असे सर्व अधिकारी अजूनही सेवेत आहेत. ते अजूनही शासकीय लाभाचा पगाराचा फायदा घेत आहेत. आपल्या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून गैरमार्गानं, असं पद मिळवलेलं असल्यामुळं त्यांनी काही संपत्तीसुद्धा जमा केली असण्याची शक्यता आहे.






