पूर परिस्थिती हाताळण्यास प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी
आंतरराज्यीय समन्वयाने करणार पूर नियंत्रण
नागपूर दि. 27 : पश्चिम महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीला लक्षात घेता जिल्यातील नदी –नाले, धरणे, तसेच तलाव आदीबाबत योग्य काळजी घ्यावी. तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय व 24 तास सुरू सतर्क ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे दिले आहेत. आंतरराज्य संपर्क ठेवण्याचे देखील त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सांगितले आहे.
जिल्ह्यात तोतलाडोह, नवेगाव खैरी, खिंडसी, नांद, वडगाव या मोठ्या 5 प्रकल्पासह मध्यम 12 व लघू 60 सिंचन प्रकल्प असून मध्यप्रदेशातील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्यावर तो तोतलाडोह धरणात येतो. मान्सूनपूर्व तयारी झाली असून त्यासाठी विभागीय व आंतरराज्यीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली आहे.
आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. 0712-256266 व टोल फ्री 1077 असा या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक असून त्यावर नैसर्गिक आपत्तीच्या काळात संपर्क करता येईल. तालुका व गावपातळीवर देखील आपत्ती निवारणासंदर्भात स्थानिक नागरिक, व अशासकीय संस्था व शासकीय अधिकाऱ्यांच्या चमू कार्यरत आहेत.
पूरपरिस्थितीत बचावकार्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामुग्री देखील जिल्हा प्रशासनाकडे आहे. नुकत्याच 10 रबर बोटी राज्यशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 381 पूर प्रवण गावात निवारागृहे, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मार्ग आदी बाबी पण तपासून घेण्यात आल्या आहेत. पुरात पाण्याखाली जाणारे रस्ते व पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली असून धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तालुका निहाय हेलीपॅडसाठी उभारण्यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या अनुषंगाने व्हॉटसअप ग्रुप करण्यात आला असून संबंधित यंत्रणांचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचा यात समावेश आहे.
सद्यास्थितीत जलसाठ्याची माहिती
तोतलाडोह- 61 टक्के, नवेगाव खैरी 70 टक्के, खिंडसी 32 टक्के, नांद 43 टक्के तर वडगाव- 60 टक्के जलसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पामधील चंद्रभागा- 58 टक्के, मोरधाम- 61 टक्के, केसरनाला- 74 टक्के, उमरी-100 टक्के, कोलार- 96 टक्के, खेकरानाला- 63 टक्के, वेण- 95 टक्के, कान्होलीबारा- 99 टक्के पांढराबोडी- 62 टक्के, मकरधोकडा- 4 टक्के, सायकी- 35 टक्के व जाम- 12 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे पशुधन, शेती, व मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. त्यामुळे यावर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी संपर्क व समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले.
आपत्ती आल्यास प्रतिसाद देणारी यंत्रणा म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असतो. गावपातळीवर शोध व बचाव पथक असतात. गावातून तालुका नियंत्रण कक्षास माहिती कळविल्या जाते तेथून जिल्हा पातळीवर संपर्क करण्यात येतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा एसडीआरएफ व एनडीआरएफच्या संपर्कात असतो. आवश्यकता भासल्यास त्यांना पाचारण करण्यात येते. तसेच विभागीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशीही माहितीची देवाणघेवाण सुरू असते.
तोतलाडोहकडे विशेष लक्ष
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी तोतलाडोह धरणात येण्यास साधारणत: 22 ते 24 तास लागतात. तोतलाडोह धरणातून नवेगाव खैरी प्रकल्पात येण्यास 3 ते 4 तास तर नवेगाव खैरीतून पेंच व कन्हान येथील बीना संगमला येण्यास 5 ते 6 तासाचा वेळ लागतो. तेथून मौदा शहरामार्गे गोसीखुर्द प्रकल्पात जाण्यास 8 ते 10 तासांचा अवधी लागतो.
मध्यप्रदेशातील पाऊस व त्यातून गेल्यावर्षी उद्भवलेली पूरपरिस्थिती बघता यावर्षी तोतलाडोह ते गोसीखूर्द पाण्याचा प्रवास लक्षात घेण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देशित केले आहे. सर्वसामान्यांना याबाबत माहिती देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.