पुरस्काराचं नामांतर गांधींच्या आकसापोटी की ध्यानचंदांच्या प्रेमापोटी ?

601

पुरस्काराचं नामांतर गांधींच्या आकसापोटी की ध्यानचंदांच्या प्रेमापोटी ?

‘खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं करण्यासाठी देशभरातील अनेक नागरिकांनी माझ्याकडं
विनंती केली होती. विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल’, पंतप्रधानांनी असं सांगत राजीव गांधी यांच्या नावानं दिला जाणारा खेल रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावानं देण्यात येईल, अशी घोषणा करून टाकली.

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या नावानं देण्यात येत असलेला खेल रत्न पुरस्कार हॉकीचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद सिंग यांच्या नावानं दिला जाणार आहे. मेजर ध्यानचंद भारतीय हॉकीचे महान खेळाडू होते. जागतिक खेळ विश्वातले हॉकीचे सर्वात महान खेळाडू म्हणून त्यांच नाव गौरवानं घेतलं जातं.

त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. मेजर ध्यानचंद यांच्या काळातच भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ बनला होता. ध्यानचंद यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी तब्बल ७ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं.

खेळाशी निगडित पुरस्काराला खेळाडुंचच नाव असल पाहिजे, याबाबत दुमत नसावे. यामुळे पुरस्काराला नाव दिल्यानं मेजर ध्यानचंद यांचा सन्मान केला गेला, अशी चर्चा सुरु झाली आहे.

पण प्रश्न असा आहे की, मोदी सत्तेवर येवून ७ वर्षे उलटून गेली तरीही नामांतराचा हा मुद्दा इतक्या दिवस का प्रलंबित ठेवण्यात आला होता ? मेजर ध्यानचंद यांच्या नावानं खेल रत्न पुरस्कार सुरु करून सरकारनं मागच्या सात वर्षापूर्वींच त्यांचा सन्मान का केला नाही ?

असो. ‘देर आये दुरुस्त आये’, या उक्तीप्रमाणं सरकारच्या निर्णयाचं स्वागत करायलाच हवं. जर मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करण्यामागे जर मोदी सरकारचा सोज्वळ हेतू असेल, तर ठीक आहे.

पण केवळ राजीव गांधी यांच्या आकसापोटी त्याचं नाव हटवून मेजर ध्यानचंद यांच्या नावानं खेल रत्न पुरस्कार दिला जाणार आहे का, याची देखील चिकित्सा करणं गरजेचं आहे.

जर मोदींनी राजीव गांधींच्या द्वेषापोटी खेल रत्न पुरस्काराच नामांतर केलं असेल, तर त्यांना पूज्य अटलजींच्या कवितेतील दोन ओळींची आठवण करून द्यायला हवी.

‘छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता’

एकीकडं जर आपण क्रीडा पुरस्कार खेळाडूंच्याच नावे दिला जावा अशा मताचे असू. तर स्टेडियम सुद्धा खेळाडूंच्या नावाने का असू नये ? हा प्रश्न आहे. मागच्याच काही दिवसांपूर्वी गुजरात मधल्या एका स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलं आहे. या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमाला खुद्द राष्ट्रपती देखील होते.

ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मागणीचं कारण देत खेल रत्न पुरस्काराचं नामांतर केलं, त्याचप्रमाणं भविष्यात भाजप विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडीयमचं नाव बदललं जाऊ शकतं.

त्यामुळे पुन्हा कुरघोडीच्या राजकारणाला वाव मिळू शकतो. अशानं खेळाडूंचा सन्मान राहायचा मागे आणि राजकारण्यांच्या नावावरूनच नव्या राजकीय ‘ऑलंपीक’ सुरुवात व्हायची! भाजपवर विविध गोष्टींच्या नामांतरावरून नेहमीच टीका होत असते. त्यामुळे चांगल्या हेतूनं जरी नामांतर केलं तरी भाजपच्या निर्णयाकडे वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जात.

भाजप नेत्यांच्या दिवंगत कॉंग्रेस नेत्यांवरील आरोपांची मीमांसा केली, तर भाजप नेत्यांच्या मनात नेहरू-गांधी कुटुंबावर नेहमीच आकस असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे खेल रत्न पुरस्कार नामांतर विषयात सुद्धा राजकारण झाल आहे का? हा प्रश्न उद्भवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here