पुणे : पुण्यात डिसेंबरमध्ये कोरोना विषाणु संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात कोरोना उद्रेकानंतर सध्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पुन्हा ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर गेल्या सात महिन्यांमध्ये पुण्याने कोरोनाचा भयंकर उद्रेक अनुभवला. त्यानंतर आता पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, कोरोनाबाधींचा आकडा डिसेबर महिन्यात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना, ”महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यात डिसेंबरमध्ये कोरोना विषाणु संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. असे होऊ नये पण झालेच तर आम्ही तयार आहोत”
शहरातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 374 पर्यंत नोंदली गेली. त्यापैकी एक लाख 50 हजार 360 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात १८ ते २४ सप्टेंबर दरम्यान कोरोनाच्या संसर्गाचा दर २८.२ टक्के होता. तो आता १२.२ टक्क्यांपर्यंत कमी आला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
शहरातील मृत्यूदर मार्चमध्ये २.६३ टक्के होते. मेपर्यंत ते सातत्याने वाढत ४.६२ टक्क्यांपर्यंत पोचले. त्यानंतर मृत्यूदर नियंत्रित करण्यात शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. जुलैमध्ये हा दर १.८१ टक्क्यांपर्यंत कमी आला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपरासून तो आता २.४१ ते २.४९ टक्क्यांदरम्यान आहे.