पुण्यातील सराईत चोर बायकोला भेटायला आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला.
सोनसाखळी चोरी केल्यानंतर फरारी झालेला सराईत गुन्हेगार पत्नीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. कोंढवा येथे हा प्रकार घडला आहे. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल १० गुन्हे उघडकीस आणून सात लाख सहा हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. असद उर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी उर्फ इराणी (वय ४७, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर ) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोराचे नाव आहे.पुणे शहरात वटपौणिमेच्या दिवशी महिलांची सोनसाखळी हिसकावून नेल्याच्या घटना घडला होत्या. त्या इराणी याने केल्या असल्याचा पोलिसांना संशय होता. सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून (युनिट ६) हद्दीत पेट्रोलिंग केले जात होते. त्या वेळी इराणी पत्नीला भेटण्यासाठी कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले आणि सचिन पवार यांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून इराणीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने शहरात विविध भागांत सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याशिवाय दुचाकीचोरीचाही एका गुन्हा उघडकीस आला. ही कामगिरी निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, हृषिकेश ताकवणे, हृषिकेश व्यवहारे, सचिन पवार, हृषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केली.




