पुणे : खुनातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी

पुणे : खुनातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी

पिंपरी चिंचवडमधील खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

पोलीस आणि आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांच्यात अर्धा तास चकमक सुरू होती. आरोपींसोबत झालेल्या झटापटीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अमृतकर यांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा दहा गोळ्या झाडून योगेश जगताप नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. मात्र याप्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण फरार होते.

या दोघांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय कामाला लागले होते. गणेश मोटे आणि अश्विन चव्हाणचा शोध घेण्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंड स्कॉड आणि गुन्हे शाखा युनिट चार तपास करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश जगतापच्या खून प्रकरणातील मुख्य गोळीबार करणारे आरोपी गुंड गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस घेत होते. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास हे तिघे चाकण परिसरातील कोये येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, हरीश माने हे त्या ठिकाणी गेले होते. 

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी गजबजलेल्या काटे पुरम चौकात तडीपार गुंड गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण या दोघांनी अचानक गोळीबार करत योगेश जगतापचा खून केला होता. या घटनेमुळे अवघे शहर हादरले होते.

भर चौकात दहशत निर्माण करत गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण यांनी पिस्तूलातून अंदाधुंद १० ते ११ गोळ्या झाडल्या होत्या. यात योगेश जगतापचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली अन आरोपींचा शोध सुरू होता.

दरम्यान, कोये परिसरातील एका टेकडीवर हे आरोपी लपून बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला आहे.

पोलिसांनी देखील चोख प्रतिउत्तर देत गोळीबार केला. ही चकमक अर्धा तास सुरू होती. अखेर आरोपींकडील दोन्ही पिस्तूलातील गोळ्या संपल्या.

त्यानंतर, गोळीबार शांत होताच पोलिसांनी लपून बसलेल्या गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे किरकोळ जखमी झाले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here