पुणेकरांची काळजी वाढणार; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण!
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यानुसार येत्या फक्त बारा दिवसांत (३० सप्टेंबरपर्यंत) आणखी तब्बल ७९ हजार नवे रुग्ण वाढणार आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ३ लाख २३ हजार ५३९ च्या वर पोहोचणार आहे. हे काही भविष्यकारांनी वर्तविलेले भाकित नाही, तर खुद्द राज्य सरकारनेच काढलेले अनुमान आहे.
यामुळे पुढच्या बारा दिवसांत पुण्यात अॅक्टिव्ह पेशंट (क्रियाशील रुग्ण) रुग्णांची संख्या ६७ हजार ८९४ वर जाणार आहे. परिणामी, पुण्यात साधे बेड (ऑक्सिजनविरहित), ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार आहे.
या अनुमानानुसार, ३ हजार १४१ साधे बेड, २ हजार ६६ ऑक्सिजन बेड आणि २५० व्हेंटिलेटर बेड कमी पडणार आहेत. केवळ बेडअभावी रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी, कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढून ती ६ हजार ६९७ वर पोहोचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या शक्येतेनुसार, पुढच्या बारा दिवसांत पुण्यात १ हजार १६१ मृत्यू वाढणार आहेत.