
?? आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे (बालभारती) तयार केल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडली जाणार आहेत. पथदर्शी पद्धतीने स्वरुपात राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत प्रत्येक घटक, पाठ, कविता यांच्या शेवटी कोरे पान जोडले जाणार असून, पुस्तकांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.
✍️ राज्यातील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर आता पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी (ता. 2 मार्च) प्रसिद्ध केला असल्याची माहीती आहे.
? पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता त्यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पाने जोडण्यात येतील. या पानांवर विद्यार्थ्यांकडून वर्ग कार्यांमध्ये शिक्षक शिकवत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी करायच्या आहेत. विद्यार्थ्यांना शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रं, महत्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य या पानांवर नोंद करून ठेवायची आहेत. पाठ्यपुस्तकांत दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ, गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी राहील.
? राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीसाठी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात यावी व त्यामध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता यानंतर वहीचे एक पान समाविष्ट करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तके देखील चार भागांमध्ये तयार करण्यात येऊन त्यामध्ये देखील आवश्यकतेनुसार सरावासाठी पृष्ठे समाविष्ट करण्यात येणार आहेत. नववी आणि दहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या अनिवार्य विषयांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात येऊ शकते.




