पिंपरी-चिंचवड महापालिकेतही “महाविकास आघाडी’

•भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन पक्ष एकत्र लढणार सार्वत्रिक निवडणूक?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अद्याप सव्वा वर्षाहून अधिक कालावधी असला तरी राजकीय वातावरण आत्तापासून तयार होऊ लागले आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात आकाराला आलेली महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर स्थापनेपासून कॉंग्रेसची तर त्यानंतर सन 2017 पर्यंत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मोदी लाट आणि प्रस्थापित नेतेमंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला 2017 मध्ये नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. या पराभवातूनही राष्ट्रवादीने गेल्या तीन- साडेतीन वर्षांत काहीही शहाणपण घेतले नसल्याचेच वारंवार समोर आले होते. मात्र गतवर्षी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर शहर पातळीवरील राष्ट्रवादीमध्ये काही प्रमाणात का होईना ऊर्जा निर्माण झाली होती.

मात्र, त्यानंतर करोनाची स्थिती निर्माण झाल्यामुळे राजकीय पटलावर शांतता होती. सध्या करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात घटल्यानंतर राजकीय हालचाली पुन्हा वेगवान होऊ लागल्या आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेने मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढण्याची घोषणा केल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

सद्यस्थितीत भाजपाकडे दोन आमदार तसेच नगरसेवकांची मोठी फौज असल्यामुळे त्यांना पराभूत करणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविल्यास भाजपाचा पराभव करणे सोपे जाईल, असाही मतप्रवाह तिन्ही पक्षांमध्ये निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

जागा वाटपाचा फॉर्म्यूला अवघड
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यानंतर शिवसेनेची व काही प्रमाणात कॉंग्रेसला मानणारा मतदार आहे. गत 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली होती. मात्र त्यामध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपांवरून घेतलेल्या भूमिकेमुळे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नव्हते. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 36 तर शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसची भूमिका काय असणार आणि शिवसेना किती जागा मागणार यावरच तीन पक्ष एकत्र येतील, अन्यथा वेगळी भूमिका घेतली जाईल, असेही बोलले जात आहे.

भाजपाचे नेतृत्त्व अन्‌ आर्थिक ताकद
भाजपाकडे स्थानिक पातळीवर दोन तगडे नेते असल्यामुळे तसेच गेल्या काही वर्षांत भाजपाच्या स्थानिक नेत्यांची आर्थिक ताकदही वाढल्यामुळे विरोधकांपुढे भाजपाला हरविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र गेल्या साडेतीन वर्षांत महापालिकेत झालेला अपहार, ओसरलेली मोदी लाट आणि महाविकास आघाडीकडे असलेली राज्यातील सत्तेची ताकद या बाबींवर महापालिकेची निवडणूक तुल्यबळ होईल, यात मात्र शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here