पावसात कार बुडाली तर इन्श्युरन्स क्लेम कसा मिळवाल ?

820

गेले दोन दिवस पडणार्‍या पावसाने अनेक गावात -शहरात पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्‍याचजणांना एका अनपेक्षीत संकटाला सामोरे जावे लागते आहे. हे संकट म्हणजे अगदी ‘सेफ पार्कींग लॉट’ किंवा ‘ओपन गॅरेज’ मध्ये उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत .या सर्व गाडी मालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे तो म्हणजे या नुकसानीची भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार का ?

आज या समस्येचे निराकरण आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर तुमची गाडी नविन असेल तर तुमच्या गाडीची जोखीम सर्वसमावेशक म्हणजे ‘काँप्रेहेन्सीव्ह रिस्क कव्हर’ इन्शुरन्स कंपनीने घेतलेली असेल. जर कर्ज घेऊन गाडी घेतलेली असेल तर गाडीचा विमा ”काँप्रेहेन्सीव्ह’ असेल याची खात्री बाळगा कारण कर्ज देणार्‍या अर्थसंस्थांची ही अनिवार्य अट असते.

पण…. पण … पहिल्या काही वर्षांनंतर केवळ विम्याचा हप्ता (प्रिमियम) कमी भरायच्या हेतूने फक्त ‘थर्ड पार्टी’ इन्शुरन्स घेतलेला असेल तर पाण्यात बुडालेल्या गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनी भरून देणार नाही.

आता समजा, तुमच्या गाडीचा विमा सर्वसमावेशक आहे तर काय कराल ?

गाडी जागेवरच उभी असेल तर ती तशीच ठेवा. जर वाहून दुसर्‍या जागेवर गेली असेल तर धक्का मारून बाजूला उभी करा. तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या हेल्प लाइनवर फोन करून तुमचे नाव -पॉलीसी नंबर आणि गाडीचे लोकेशन कळवा . कंपनीकडून सर्व्हेअर येऊन गाडीचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेईल. जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल तर गाडी टो करून गॅरेजला पाठवली जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून गाडी इन्शुरन्स कंपनीच्या खर्चात दुरुस्त होईल.

आता या सगळ्या धावपळीत एक मोठी घोडचूक तुमच्या हातून होण्याची शक्यता आही ती म्हणजे सर्व्हेअरला बोलावण्याच्या आधीच इग्नीशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न करणे. हे जर तुम्ही केलेत तर गाडीचे इंजीन ‘हायड्रोलॉक’ होईल. हायड्रोलॉक म्हणजे गाडी सुरु होताना इंजीनमध्ये पाणी घुसेल आणि इंजीन ‘सिझ’ होईल. इंजीन ‘सिझ’ झाले की ते कामातून जाईल.

इन्शुरन्स करारानुसार हा गाडी सुरु करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले इंजीनचे नुकसान ‘कॉन्सिक्वेंशिअल लॉस ‘ म्हणजे तुमच्या हातून घडलेल्या चुकीमुळे ‘मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान’ या सदरात जाईल. परीणामी इंजीनचा येणारा खर्च कंपनी देणार नाही. एकूण नुकसानीत इंजीन हाच मोठा खर्च असतो तोच मिळाला नाही तर इतर नुकसान भरपाई मिळूनही काहीच फायदा नाही.

तेव्हा लक्षात ठेवा, पाण्यात बुडलेली गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करू नका !!! आता हाच हायड्रोलॉकींगचा धोका साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्यात उद्भवू शकतो, अशा परीस्थितीतही इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील नाही हे पण लक्षात ठेवा.

जर ‘अ‍ॅड ऑन ‘ म्हणून इंजीनचा स्वतंत्र विमा त्याच पॉलीसीत घेतला असेल तर ही ‘कॉन्सिक्वेंशिअल लॉस ‘ अट लागू पडत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here