पालिकेनंतर झेडपी निवडणुकीतही राष्ट्रवादीचे मनोमिलन, एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब

    15

    सोलापूर : पुणे आणि पिंपरी महापालिकेमध्येदोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यानंतर आता त्याचा पुढचा भाग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसणार आहे. दोन दशकांच्या दुराव्यानंतर जसे ठाकरे बंधू एकत्र आले. तसंच काहीसं चित्र आता पवार काका-पुतण्यांबाबत दिसू लागलंय. गेले तीन-चार वर्ष अजित पवार आणि शरद पवारांमध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर, आता जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत.

    सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिर्तीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. जित पवारांच्या बारामतीमधील निवासस्थानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापुरातील एक खासदार, चार आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

    अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत शरद पवार गटाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण आबा पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार राजू खरे आणि सोलापूरचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख हे उपस्थित होते. तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हेही या बैठकीस हजर होते. अजित पवारांनी या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकाच चिन्हावर लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर रविवारी दोन्ही राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

    एकंदर शरद पवार आणि अजित पवार यांच्या झालेल्या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित् झालं आहे. सोलापूर महापालिकेत झालेल्या नामुष्कीजनक पराभवानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. सोलापूर जिल्हा हा पहिल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतेक नेते जरी अजितदादांसोबत गेले असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले आहेत. तसेच धैर्यशील मोहिते पाटलांच्या रुपात माढ्यामध्ये खासदारही निवडून आला. त्यामुळे राज्यभरात बळकट असलेल्या भाजपला मात्र सोलापुरातून मोठं आव्हान मिळताना दिसतंय. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर अजित पवारांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here