अहमदनगर – जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील केळवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सक्षम गणेश आठरे या आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. १४ ऑक्टोबर रोजी तलुक्यातील मढी येथील साळवे वस्तीवरील श्रेया साळवे या लहान मुलीला उचलून नेवून बिबट्याने भक्ष बनवली होते.एकाच आठवड्यात बिबट्याने दोन चिमुरड्यांना भक्ष बनवल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पाथर्डी शहरापासुन सुमारे सहा किलोमीटर अंतरावर माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला केळवंडी गाव आहे. माणिकदौंडी घाट उतरल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला आठरे यांची वस्ती आहे.नेहमीप्रमाणे घरासमोरील पडवीत आजोबा बरोबर आठ वर्षाचा सक्षम झोपला होता.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झोपेत असलेल्या सक्षमवर हल्ला केला. हल्ल्यानंतर सक्षम जोर जोरात ओरडला. घरातील इतर सदस्य जागे झाले.मात्र सर्वांसमक्ष बिबट्याने सक्षमच्या पायाला धरून ओढत नेले.वस्ती पासूनच काही अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात बिबट्याने सक्षमच्या शरीराचे लचके तोडले. घटनेची माहिती समजताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी,नातेवाईक व मदतीला आलेल्या नागरिकांना तुरीच्या शेतात सक्षमचा मृतदेह सापडला.नागरीकांना पाहून बिबट्याने डोंगरात धूम ठोकली.सक्षमचा कमरेचा काहीभाग व एक पाय बिबट्याने पूर्ण फस्त केला होता.उपजिल्हारुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर दुपारी सक्षमच्या मृतदेहावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यापूर्वीही शेतकऱ्यांची अनेक जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत.परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे अनेकदा मागणी केली मात्र वनविभागाने याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याने ही वेळ आली आहे असा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बन्सी आठरे व सामाजीक कार्यकर्ते भाऊसाहेब शिरसाठ यांनी केला आहे.वन विभागाने आता तरी गांभीर्याने घेऊन पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.